आठवणी अमेरिकेच्या !!!!! - भाग १

डेस्कटॉप वर इमेजेस बदलत असताना एक फोल्डर सापडलं, या वर्षी (2014) झालेल्या आमच्या GRAND USA टूरचं. आणि आठवणींचा पूर आला एकदम. एकेक फोटोतून आठवत गेले ते ४६ दिवस अमेरिकेत नांदलेले. हो म्हणजे काय, "नांद्लो" आम्ही तिथे इतके दिवस. निमित्त होतं "कौशलकट्टा" हा कार्यक्रम, आणि तिथल्या मराठी मित्र मैत्रिणींना भेटून अगदी घरच्यासारखं फिलिंग आलं.

New York  - Connecticut -  New Jersey -  Philadelphia - Washington DC - Raleigh - Nashville - Atlanta - Houston - Phoenix - Los Angeles - San Francisco -  Detroit &  Minneapolis. असे एकूण १३ प्रयोग झाले. या सर्व शहरांतून फिरताना अमेरिकन संस्कृती, राहणीमान, जीवनशैली सगळं जवळून पाहायला मिळालं. अनुभव समृद्धता म्हणतात ती यालाच. या आधी पु. लं. चं, अपूर्वाई वाचलं होतं. आणि आता प्रत्यक्ष याची देही पाहिल्यावर मन प्रसन्न झालं.

हवाच वेगळी आहे तिथली. हे फोटो पहा तुम्हांला लक्षात येईल मी काय म्हणतोय ते.





 हे फोटोज आहेत प्रसिद्ध Times Square चे. अत्यंत उत्साहवर्धक जागा आहे ती. तिथली एनर्जी पाहून थक्क व्हायला होतं. तिथले रंग मनाला आकर्षित करतात. काय पाहू आणि काय नको असं होतं. उंच च्या उंच इमारती, त्यांच्या मधून निघणाऱ्या Streets आणि Avanues, Yellow Cabs, Black Uniform घातलेले Handsome Police Officers, घोड्यावर बसून Patrolling करणारे पोलीस - असंख्य ऑफिसला जाणारे लोक, धडधडती भुयारी मेट्रो रेल्वे - समस्त वातावरणात कॉफी चा गंध - एक ना दोन. सगळं साठवून घेतलं डोळ्यांत आणि मनात. घरून आदेश होता की "बघा, नुसते फोटो काढून तो क्षण वाया नका घालवू." अगदी बरोबर सूचना होती, हे तिथे अनुभवायला मिळालं. 

आज या भागात New York विषयी सांगतो. खूप काही सांगण्यासारखं आहे. Times Square ला फिरताना वेळ कसा जातो हे कधीच समजत नाही. जशी आपली मुंबई २४ तास सुरु असते तसाच हा भाग सदैव फुललेला असतो विविध रंगांनी.....

आम्ही असेच फिरत असताना आम्हाला दिसला एक बोर्ड - "CHICAGO THE MUSICAL. "



कौशल दादाचं आधीपासून ठरलेलं होतं हा प्रयोग पहायचं, आमची बाकीची टीम "मावशी" ला पाहण्यात interested होती. मावशी म्हणजे "Statue Of Liberty" (इति मंदार गोगटे) पण मी कौशल दादा सोबत शिकागो साठी वर्णी लावली आणि एक जबरदस्त सांगीतिक अनुभव मिळाला. 


एकदा एका मित्राकडे "शिकागो" फिल्म पहिली होती, पण याचं नाटक पाहणे हा अतिशय वेगळा अनुभव होता. स्टेज वरती मध्यभागी १५ लोकांचा लाइव ऑर्केस्ट्रा, आणि दोन्ही बाजूंना विंगेकडे बसलेले कलाकार. त्यांचे ते प्रवेश, डान्सेस, सर्कशीत करतात तश्या थरारक एन्ट्रीझ, बापरे, आणि सगळे कलाकार गाऊन, अभिनय करून, नाचत होते. त्यांचा उत्साह - त्यांची तडफ - त्यांचा आवेश - त्याचं कला जगणं सगळंच केवळ "अद्भूत"


एक कलाकार म्हणून स्टेज वर जेव्हा तुम्ही स्वत: वावरता, तेव्हा तुम्हांला लक्षात येतं की समोर घडत असलेलं संगीत - नाट‌‍‌्य - नृत्य सादर करत असताना, तो कलाकार काय पातळीवर स्वत: ला झोकून देत असतो......शब्दांत वर्णन करणे अशक्य आहे, ते पाहायलाच हवं. प्रत्येक कलाकाराने आयुष्यात एकदा तरी "शिकागो" पाहायलाच पाहिजे. 


नंतर माहिती वाचताना लक्षात आलं की हे नाटक याच ठिकाणी गेली १४ वर्ष चालू आहे, प्रत्येक प्रयोग असाच हाउसफुल. मान गये......ही आहे कलेला मिळालेली मानवंदना. खूप भरून आलं प्रयोगाच्या शेवटी. उभे राहून टाळ्या वाजवल्या, आणि बाहेर आलो तरी खूप दिवस Hang-Over गेला नाही. 

पुन्हा New York ला जाईन तेव्हा पुन्हा हेच नाटक पाहीन, Times Square पुन्हा भरून घेईन श्वासात. उत्साह संचारेल नवीन जोमाने आयुष्य जगण्याचा. 












   
       पुढील भागात नवीन शहर नवीन गोष्टी.......




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"श्रेया घोषाल" - बस नाम ही काफी है !!!!!

"कमलेश भडकमकर - एक मॉडर्न अवलिया"

कलाकारांचं आर्थिक नियोजन