"श्रेया घोषाल" - बस नाम ही काफी है !!!!!



संगीताच्या प्रवासात अनेक आश्चर्यकारक गोष्टी घडत असतात. त्या घडेपर्यंत आपला विश्वास बसत नाही, पण त्या घडत असतानाचा अनुभव नितांत सुंदर असतो. एक दिवशी बायकोचा फोन आला, की अवधूत वाडकर (आजीवासान स्टुडिओचा प्रमुख ध्वनिमुद्रक व सुरेशजी वाडकरांचा पुतण्या ) तुला शोधतोय. एकदा त्याला कॉल कर. आता वास्तविक अवधूतचा मला कॉल यावा ही नेहेमीतली गोष्ट नव्हती. मी त्याला फोन केला तेव्हा त्याने मला सांगितलं की श्रेयाजींचे मॅनेजर  श्री. भरतभाई एक गायक शोधत आहेत, श्रेयाजींच्या शोज साठी. तू त्यांना फोन करशील का? मी त्यांना तुझं नाव सजेस्ट केलंय. हे ऐकल्यावर एक मिनिट विश्वास बसेना, कारण माझा प्रिय मित्र ह्रिषीकेश रानडे  श्रेयाजींसोबत असतो हे मला चांगलं ठाऊक होतं, कित्येक वेळा ह्रिषीशी बोलताना आम्ही त्याबद्दल बोलत असू.

असो, मी विचार केला आणि लागलीच भरतभाईंना फोन केला. अत्यंत प्रोफेशनल असतात ना, तसा भारदस्त आवाज ऐकू आला. त्यांनी मला भेटायला बोलावलं आजीवासन मधेच. आणि दुसऱ्या दिवशी मी पोहोचलो. ६ फूट उंचीचे साठीचे एक तेजस्वी, पण मृदू गृहस्थ भेटले. म्हणजे भरतभाई. अगदी ५ मिनटात त्यांनी मला सगळी प्रस्तावना सांगितली आणि श्रेयाजींबरोबर तुला काम करायला आवडेल का ? असे विचारले. (भरतभाई म्हणजे श्री. भरत आशर - ते पंचमदांचे  सहाय्यक होते अनेक वर्ष - हे मागाहून मला समजलं)

हे सगळं  स्वप्नवत होतं. मराठी चित्रपट सृष्टीत धडपडणाऱ्या माझ्यासारख्या नवोदित गायकाला एकदम श्रेयाजींसोबत गायला मिळणं खूप मोठं होतं. अश्विनी - माझी आई - माझा भाऊ सगळॆ खूप खुश झाले. पहिला कार्यक्रम अहमदाबादला आहे असे कळले. श्रेयाजींना भेटण्यासाठी मला भरतभाईंनी एका स्टुडिओत बोलावले... आणि तो क्षण माझ्यासाठी अमूल्य बनला. श्रेयाजी भेटल्या. त्यांनी खूप छान रिसिव्ह केलं, आणि म्हणाल्या "जो भी गाओगे, दिल से गाना बस्स..."

अहमदाबाद कॉन्सर्ट आधी एक तालीम होती. मला श्रेयाजींच्या टीम सोबत त्यांची सगळी गाणी पाहायची होती. ११ ची तालीम, श्रेयाजी आल्या. त्यांच्या सोबत एकेक गाणं गाताना खूप मजा येत होती. ज्यांनी ओरिजिनल गाणी गायलीयेत, त्यांच्यासोबत उभं राहून गायचं म्हणजे खरंच खूप टेन्शन असतं, पण त्या खूपच हेल्पफुल होत्या. त्यांनी मला गाण्यांमधले काय काय पार्टस आहेत ते समजावून सांगितलं, ब्रेक दरम्यान माझ्याशी खूप बोलल्या. मला खूप आपुलकीने त्यांनी त्यांच्या टीमचा भाग बनवून घेतलं, खूप सही वाटलं.

"देवदास" मधल्या "बैरी पिया" पासून त्यांचा फॅन होतो, आणि आज १५ वर्षांनी त्यांच्या सोबत उभा राहून त्यांना साथ देत होतो. स्पेशल फीलिंग.  १९ डिसेंबर २०१५. अहमदाबाद. तो दिवस खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. त्या दिवशी पहिल्यांदा मी श्रेयाजींबरोबर स्टेज शेअर केलं, आणि भरून पावलो.

एका सर्वोत्कृष्ट गायिकेसोबत गाणं हा एक बहुमान मला मिळाला. माझ्या बाबांना खूप आनंद झाला असेल. आईचे आशीर्वाद, अश्विनीचा सदैव सपोर्ट आणि माझ्या स्नेहबंधातल्या सगळ्या मित्रपरिवाराच्या अमूल्य शुभेच्छा या क्षणाच्या पाठीशी उभ्या होत्या. काम देवकृपेने चांगलं झालं. त्यानंतर लगेचच मॉरिशसला जाण्याचा योग्य आला. त्यानंतर २ महिन्यांनी लंडन, आणि ऍमस्टरडॅमला सुद्धा त्यांच्या सोबत परफॉर्म करायची संधी मिळाली.

एक आदर्श कलाकार म्हणून श्रेयाजींकडे बघता येईल. खूप शिकलो. खूप ऐकलं, त्या कसा सूर लावतात, कशी शब्दफेक करतात, मजा आली. गाण्याच्या या क्षेत्राने मला आजवर असे अनेक स्पेशल अनुभव दिलेत, प्रत्येक अनुभवातून मला खूप काही मिळालय. संगीत क्षेत्रात काम करताना मला भेटलेले हे सगळे ग्रेट्स, त्यांनी दिलेले "अपार, सुखद अनुभव", गाठीशी घेऊन माझी वाटचाल सुरु आहे. अशीच देवाची कृपा असावी आणि उत्तमोत्तम अनुभव मिळत जावेत.

शेवटी अनुभवच माणसाला शिकवतात..... आपण विद्यार्थी असतो, 
जीवनाच्या शाळेत शिकत राहतो !!!!!!


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"कमलेश भडकमकर - एक मॉडर्न अवलिया"

कलाकारांचं आर्थिक नियोजन