"कमलेश भडकमकर - एक मॉडर्न अवलिया"



"कमलेश भडकमकर - एक मॉडर्न अवलिया"


दुबई: शेख रशीद ऑडिटोरियम. महाराष्ट्र मंडळ दुबईचा कार्यक्रम. सारेगमप लिटल चॅम्प चे लिटल वंडर्स. आणि त्यांचा दादा - कमलेश दादा.

पहिली भेट झाली आमची, तेव्हा कमलेश दादाचं नाव मी खूप ऐकून होतो. सारेगमप तर आहेच, पण माझा रूम मेट - पराग साठे कडून, खूपदा ऐकलं होता "कमलेश दादा" या रसायनाबद्दल. भेट झाली तेव्हा खूपच सिरियस वाटला दादा. म्हणजे तो आहेच. असतोच. त्याच्या कामाला घेऊन तो खूप Focused असतो नेहेमी.

कोल्हापुरात एक कॉन्सर्ट होणार होतं जिथे मला वैशाली सामंत सोबत गायचं होतं, आणि तिनेच मला "कमलेशला भेट" म्हणून सांगितलं होतं. खूप बोललो नाही आम्ही, पण थोडक्या शब्दात ओळख झाली आणि दादाने मला कोल्हापुरात काय काय गायचं ते सांगितलं.

कट टू  - कोल्हापूर - स्टार प्रवाह चॅनेल चं  कॉन्सर्ट होतं - वैशाली सामंत कॉन्सर्ट , मी दुबईहून कोल्हापुरात पोचलो सकाळी वाजता आणि हॉटेल च्या लॉबीत कमलेश दादा भेटला. सकाळी रिहर्सल ला बघतो तर सारेगमप चे सगळे दिग्गज वादक कलाकार पुढ्यात, आणि त्यांच्या सोबत मी नवा गडी. खूप मजा आली या सर्वांना जवळून पाहण्याचीत्यांच्यासोबत काम करण्याची.

कमलेश दादा सोबत तिथून जे नातं सुरु झालं ते मग दृढ होत गेलं, त्याची काम करण्याची पद्धत, मेहेनतीची परिसीमा पाहून त्याच्याकडून खूप गोष्टी शिकता आल्या. आजही शिकत असतो. खळे  काकांचा "परम शिष्य" हे बिरुद तो सार्थ ठरवतो. संगीत संयोजन हा त्याचा जीव की प्राण. त्याचे वादक, त्याचे मित्र, त्याचे
स्नेही, या सर्वांचं त्याच्यावर मनापासून प्रेम. अत्यंत कमी बोलणारा, पण जोक सांगताना खळखळून हसणारा कमलेश दादा. त्याला चिडतानां पाहिलंय मी एक दोनदा. पण कमी. एक गोष्ट खूप मोठी वाटते मला त्याच्याबद्दल. तो नेहेमी प्रत्येक कलाकाराला त्याची स्पेस देतो. कधीच त्यात ढवळाढवळ करत नाही. वास्तविक त्याला इतका अनुभव आहेपण तो कलाकारांचं ऐकून त्यांच्या कलाने घेतो. ही खूप मोठी Quality  आहे त्याच्यातली.

तो नवनवीन कलाकारांना संधी देतो. त्यांना ट्राय करून त्यांच्यात आत्मविश्वास फुंकतो. एखादा कलाकार धडपडत असेल तर, त्याला कमलेश दादा मदतीचा हात देतो. चूक झाली तरी सांभाळून घेतो. म्हणून एक कलाकार म्हणून तर तो ग्रेट आहेच, पण माणूस म्हणूनही तितकाच ग्रेट आहे तो. मला त्याने सुरुवातीपासून त्याच्या विविध कार्यक्रमात सहभागी करून घेतलय. अनेक कार्यक्रम, रेकॉर्डिंग्स, रिहर्सल्सअनेक वेळा मारलेल्या गप्पा, त्याच्यासोबतचे प्रवास..... खूप चांगला वेळ घालवलाय दादा सोबत.

जेव्हा जेव्हा काहीतरी नवीन प्रोजेक्ट करतो तेव्हा तो मला बोलावतो गायला आवर्जून. आपण करत असलेल्या मेहेनतीचा तो उत्तम पारखी आहे. आपल्या कामातली सचोटी तो ओळखतो. नाव झालेलं नसलं तरी, त्याच्या सर्व वादक, गायक कलाकारांसोबत खंबीरपणे  तो उभा राहतो. आजकाल अशा व्यक्ती कमी असतात. मलाच काय तर पुढच्या अनेक पिढ्यांना असेच कमलेश दादा मिळो आणि त्यांना या क्षेत्रात काम करण्यासाठी पाठबळ, आत्मविश्वास आणि उर्मी मिळूदेत.

कमलेश दादा, तुला थँक्स म्हणणं खूप लहान आहे. तुझ्या उपकारांची परतफेड अशक्य आहेएका होतकरू गायकाने तुझ्यापाशी यावं आणि समृद्ध व्हावं हे म्हणजे उन्हातून चालणाऱ्या एका वाटसरूने वटवृक्षाखाली येऊन उभं राहावं आणि सावली घ्यावी तसा तू आमच्यासाठी आहेस.

तुला उदंड आयुष्य लाभो आणि जितकं शक्य होईल तितकं जास्त तुझ्यासोबत सदैव काम करायला मिळो हीच सदिच्छा.









टिप्पण्या

Unknown म्हणाले…
कमलेश तुला Thanks �� म्हणणं आणि तुझ्या उपकारांची परतफेड करणं केवळ अशक्यच आहे.

जयदीप, एकदम perfect विचार मांडले आहेत तू कमलेश बद्दल...

तू, मी आणि जाणे किती लोकांचे आयुष्य त्याने उत्तम मार्गाला आणि सार्थकी लावले आहे, हे त्यालाही माहिती नसावे.

त्याच्या ह्या उदार अंतःकरण असलेल्या सुरेल मनाला मनःपूर्वक सलाम !!!

Kamlesh जय हो !!!

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"श्रेया घोषाल" - बस नाम ही काफी है !!!!!

कलाकारांचं आर्थिक नियोजन