सूर निरागस हो !!!!!!!!





"कट्यार काळजात घुसली" - एक संगीत परंपरा, अजरामर झालेली, दारव्हेकर मास्तरांच्या समृद्ध लेखणीतून उतरलेली. नाटक दुर्दैवाने पाहता आले नाही, पण सिनेमा पाहिला आणि कृतार्थ वाटलं. एक काल्पनिक कथा ३ कलाकारांची, कलाकारातल्या नम्रतेची, अहंकाराची आणि धाडसाची. हे शिवधनुष्य पेलणं खूपच कठीण होतं....

सुबोध भावे या आजच्या काळातल्या जाणत्या - जबाबदार - अभ्यासू - कलाकाराने हा विडा उचलला. आणि पुढे जे झालय ते आपण सगळे अनुभवतो आहोत आत्ता या क्षणी. सिनेमा भरभरून देतोय रसिकांना. आणि रसिक तृप्त होतायत.




कट्यार चे संगीत हा तर तिचा आत्मा. ही जबाबदारी थेट पंडित अभिषेकी बुवांकडून शंकर महादेवन यांच्यावर सोपवलेली होती.....आणि त्यांनी सुद्धा पुरेपूर न्याय देत रसिकांना मंत्रमुग्ध केलं, त्यांच्या लोभस आवाजाने, अप्रतिम लयकारीने आणि अत्यंत रुचीसंपन्न संगीताने. शिवाय त्यांनी पंडितजी हे पात्र तितक्याच निर्मळतेने अभिनेता म्हणून सादर केलं. आजच्या काळातले पंडितच आहेत शंकर महादेवन सर. तुम्हाला शतश: नमन. येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी हे आदर्शवत कार्य तुम्ही करून ठेवल्याबद्दल. कट्यार मधील अजरामर गीतांपुढे जाऊन मनमंदिरा, सूर निरागस हो, इलाही, अरुणी किरणी अशी एकाहून एक सरस गीते त्यांनी या सिनेमा मध्ये गुंफली आहेत. केवळ अप्रतिम.



ही गाणी लिहिणारे हात,  समीर सामंत, मंदार चोळकर आणि मंगेश कांगणे यांचंही कौतुक करावं तितकं कमी आहे. या कथेसाठी गीते लिहिणे ही खूपच कलात्मक आणि कठीण गोष्ट होती. या युवा गीतकारांनी ती लीलया पेलली आहे त्यासाठी त्यांचे खास अभिनंदन.



सचिनजी आणि खासाहेब हे एक जमून आलेलं समीकरण. सचिन जींनी आपला सगळा अनुभव पणाला लावून ही भूमिका जिवंत केली आहे. अगदी पहिल्या फ्रेम पासून ते सिनेमाची पकड घेतात. आणि खासाहेब जगतात. त्यांचे काही सीन अंगावर आल्यावाचून राहत नाहीत, उदाहरणार्थ "अल्लाह आखिर मुझे कामयाबी मिल ही गयी - १४ बरस !!!!!" किंवा "मुझे इस कटारसे एक खून मुआफ है" आणि इतर सर्वच. Simply Marvelous असच वर्णन करावं लागेल त्यांच्या या भूमिकेच.



त्यांना लाभलेला आवाज आहे - राहुल देशपांडे या अत्यंत गुणी गायकाचा. आमच्या पिढीला लाभलेलं एक वरदान म्हणजे राहुल ची त्याच्या आजोबांकडून आलेली नितांत सुंदर लयकारक गायकी. अहाहा काय सुंदर गायलंय राहुल दादाने, दिल की तपिश, घेई छंद मकरंद, सुरत पिया की.....कानसेन तृप्ती. पंडित वसंतराव देशपांडे सुद्धा नक्कीच भारावून गेले असतील या संगीत पुष्पांनी.

मृण्मयी व अमृता यांच्या भूमिकाही साजेश्या, आणि दोघींनी खूप समजून निभावलेल्या आहेत. या सिनेमाची जान आणि आपल्या सगळ्यांचा लाडका नट सुबोध भावे, नव्हे आता दिग्दर्शक सुबोध नेहेमीप्रमाणे छाप पाडून जातोच.



सुबोध कडे पाहताना खूप अभिमान वाटतो. तो एक जाणकार, आणि खूप व्यासंग असलेला अभिनेता आहे ह्याची प्रचीती नेहेमीच त्याचे सिनेमे पाहताना आलीये. मग तो बालगंधर्व असो वा लोकमान्य. सुबोध जीवाचं रान करून भूमिका उंचीवर नेतो आणि नेहेमी सच्चा वाटतो.

त्याने दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट; पण अत्यंत सफाईदार आणि एक उत्तम कलाकृती म्हणून नावारूपाला येतोय याचं कारण सुबोधची आणि त्याच्या प्रिय टीमची मेहेनत. वैभव चिंचाळकर या त्याच्या मित्राने त्याला केलेली मदत अवर्णनीय आहे. सुबोधने या सिनेमासाठी हिंदीतले मातब्बर पटकथा लेखक प्रकाश कापडिया यांच्याकडून कट्यार लिहून घेतलाय, ह्याचा प्रत्यय आपल्याला आल्यावाचून राहत नाही.

आदित्य ओक या माझ्या मित्राचं उत्तम संगीत संयोजन आहे, आणि विशेष म्हणजे या सिनेमाला लाभलेलं आर्थिक पाठबळ. ZEE STUDIO चे खूप आभार. त्यांनी काहीही मागे पुढे न पाहता दिलेल्या पाठीम्ब्यामुळे कट्यारचं रुपेरी स्वप्न पडद्यावर दिमाखात उभं राहू शकलं. त्यांचे आभार प्रत्येक मराठी माणसाने मानले पाहिजेत. या सिनेमाच्या सर्व विभागातल्या कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळींचे ही खूप श्रेय आहे सिनेमाच्या भरारी मध्ये.


आणि आता कट्यार मधील, मला भावलेली सगळ्यात लोभस गोष्ट - म्हणजे एक नवीन आवाज - महेश काळे याचा.


मागच्या वर्षी San Fransisco  मध्ये भेट झाली होती तेव्हा कट्यारचं काम सुरु होतं. आणि चर्चा चालू होत्या पण त्यावेळी फार काही अंदाज आला नाही. आज जेव्हा महेशने अरुणी किरणी गाऊन शेवटचा सूर निरागस हो.....या "हो" चा षड्ज लावला, तिथे पहिल्यांदाच नुसतं ऐकून डोळ्यात पाणी आलं. त्याने त्याच्या गायकीने माझ्या अंतरात्म्याला स्पर्श केला, मी त्याला तत्क्षणी मेसेज केलेला आठवतोय.

मला एक क्षण असं वाटून गेलं की, पंडित जितेंद्र अभिषेकीन्नी येऊन महेशच्या स्वरातून आपला आशीर्वाद या सिनेमाला दिलाय......आणि एका कलाकाराला ज्या दैवी चरणस्पर्शाची अनुभूती त्याच्या गाण्यातल्या उत्तुंग स्वराला बिलगल्यावर येते; तीच प्रचीती मला महेशच्या अरुणी किरणी ने आली......

संगीताच्या आजच्या संक्रमण काळात,  कट्यार सारखा सिनेमा घेऊन आलेली ही सर्व मंडळी मला उत्तुंग वाटतात. मराठी सिनेक्षेत्रात एक वेगळा ठसा कट्यार ने नक्कीच उमटवला आहे. रसिकांना पुन्हा एकदा प्रचंड आशावाद दिला आहे, की संगीत अजरामर असतं, त्याचा आस्वाद घेता आला पाहिजे, कट्यार ने खूप आनंद दिलाय. कुठे आजकाल असे सिनेमे बनतात ज्यांना पाहून पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत माणूस रडू शकतो?

पुढच्या अनेक पिढ्यांसाठी ही कलाकृती म्हणजे आपल्या संस्कृतीचे रुपेरी जतन आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"श्रेया घोषाल" - बस नाम ही काफी है !!!!!

"कमलेश भडकमकर - एक मॉडर्न अवलिया"

कलाकारांचं आर्थिक नियोजन