मराठीत शिक्षण : वर्तमान आणि भविष्यातील आव्हान


प्राथमिक शालेय शिक्षण – लोकमान्य प्राथमिक विद्यालय, मुलुंड पूर्व.
माध्यमिक शालेय शिक्षण – वामनराव मुरांजन माध्यमिक विद्यालय, मुलुंड पूर्व व
                       कॅप्टन रवींद्र माधव ओक हायस्कूल कल्याण पश्चिम.

हे लिहिताना आज सुद्धा इतकं छान वाटतंय, की तीनही शाळा आठवताहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत असताना केलेला अभ्यास, परीक्षा, तिमाही, सहामाही, वार्षिक, प्रगती पुस्तक, प्रार्थना, पी.टी. , मधली सुट्टी एक ना अनेक.....हे सगळं आठवतंय. किती संस्कार केलेत मराठी शाळांनी आजवर. किती ग्रेट माणसं घडवलीयेत; याची ददात नाही. पण हीच मराठी शाळा आज धडपडतेय तिच्या अस्तित्वासाठी. विदारक परिस्थिती आहे मराठी शाळेची आणि मराठीतून शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्यांची.
मी मराठी शाळेत शिकलो. त्यानंतर कॉलेज मध्ये गेलो तर इंग्लिश ची थोडी बोंब होती, पण हळू हळू इतरांबरोबर राहून, बोलून, यायला लागली ती पण भाषा. अगदी त्या भाषेत परीक्षा देवून चांगले मार्क्स मिळतील इतपत. तिथून अभियांत्रिकीला गेल्यावर सुद्धा कधी असं जाणवलं नाही की आपण मराठी मिडीयम मधून आलेलो आहोत. त्याच्यापुढे जाऊन परदेशात नोकरी, आणि आता गायनाच्या क्षेत्रात व्यावसायिक होईपर्यंत मराठी शाळेत शिकल्याचा अभिमान आहे आणि तो असाच राहील. माझा तर हा ही हट्ट आहे की, माझ्या मुलांनी मराठी शाळेत शिकावं. पण त्याला विरोध होतोय पेक्षा, माझी मुलं शाळेत जाईपर्यंत मराठी शाळाच उरलेल्या असतील का? मुलांना मराठी शाळेत जावं अशी इच्छा उरेल का ?

याचं उत्तर आज द्यायचं असं ठरलं तर निश्चितच “नाही” असं असेल. आता असं का? तर आपल्याकडे महानगरपालिका शाळा या दुरवस्थेत आहेत. कारण सरकारचे त्यांच्याकडे लक्ष नाही. पालिका शाळांना चांगल्या सुविधा नाहीत, शाळेच्या इमारती वाईट अवस्थेत आहेत. शिक्षकांचा दर्जा ढासळतोय. का? तर बी. एड. करणारे इच्छुक कमी झालेत. का? तर त्यांना पगार कमी आहेत.
खाजगी मराठी शाळा बोटावर मोजाव्यात इतक्याच उरलेल्या आहेत. काही पुण्यवान धनिक मंडळींनी खूप वर्षांपूर्वी तरतूद करून ठेवल्यामुळे, आणि त्यांच्या वंशजांनी त्यांचा वसा पुढे चालू ठेवल्यामुळे या शाळा कार्यरत आहेत. ही एकच काय ती उत्साहजनक बाब मराठी शाळेच्या संदर्भात उरली आहे.

आता जर या भीषण परिस्थितीत आपल्याला बदल घडवून आणायचा असेल, तर तो खालील काही बाबतीत आणावा लागेल.

१ – समाज मानसिकता
समाजात ही मानसिकता रुजायला हवीये की मराठी शाळेत शिकून मुले जगात नाव कमवू शकतात. त्यांना आयुष्यात कुठेही कसलीही अडचण येत नाही. आपल्या मराठी शाळा सुद्धा उत्तम इंग्लिश भाषा शिकवतात.

२ – शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल करणे जरुरीचे
इतिहास काय शिकवला जातो आपल्याला ? शिवाजी महाराज म्हणजे गड, किल्ले, अफझलखान वध, शाहिस्तेखानाची  कापलेली बोटे, महाराजांची आग्र्याहून सुटका......बस? अहो इतिहास किती वैभवशाली आहे मराठ्यांचा? हे जर आपल्या मराठी शाळेतून, आपल्याच भाषेतून मुलांना नाही शिकवलं तर त्यांना आपल्या मातीबद्दल आत्मीयता कशी वाटणार? का त्यांनी फक्त सिनेमे बघून इतिहास शिकायचाय?

आपली जुनी झालेली शिक्षण पद्धती आज बदलण्याची खूप गरज आहे. आज इंटरनेट सारखे प्रभावी माध्यम असताना इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान आणि इतर सर्व विषय खूप प्रभावीपणे शिकवता येतील. गोडी निर्माण होईल, रस निर्माण होईल. मुलांची सर्वांगीण प्रगती होईल.

३ – कलांचा विकास
शालेय जीवनापासून जर विद्यार्थ्यांना एखाद्या कलेची गोडी लागली तर त्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. संगीत, नृत्य, अभिनय आदी कलांचा वापर करून मराठी साहित्य शाळांमधून प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले पाहिजे.

४ – उत्तम सुविधाजनक शाळा
आज जिकडे तिकडे International School चा बोलबाला आहे. काय असतात ह्या आंतरराष्ट्रीय शाळा? आंतरराष्ट्रीय स्तरावर काही शालेय निकष बांधलेले आहेत जसे, मुलांना शाळेच्या वेळेत २ वेळा खाऊ दिला गेला पाहिजे, त्यांना खेळायला मिळाले पाहिजे, त्यांना त्यांचे छंद जोपासता आले पाहिजेत इत्यादी. मुलांच्या दृष्टीने विचार करून त्यांना विविध सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत. ही गोष्ट फार महत्वाची असून आपल्या मराठी शालेय शिक्षणात याचा उपयोग केला गेला पाहिजे. का एखादी “मराठी आंतरराष्ट्रीय शाळा” असू शकत नाही? असू शकते. आपण जर मराठी शाळा जोपासण्यासाठी काम केलं तर अशा अनेक उतमोत्तम संकल्पना आपण राबवू शकतो.

आज मराठी भाषा ही धोक्यात आहे. आपण सर्व आपल्याच मातृभाषेत एक ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी साधा प्रवासही करू शकत नाही. अश्या परिस्थतीत मराठी शाळा आणि त्यांची दुरवस्था हा बिकट प्रश्न आहे. आपल्यातल्या धनिक, विचारवंत, कलाकार आणि सर्व स्तरातल्या मंडळीनी एकत्र येऊन आपल्या भाषेसाठी आणि आपल्याच मुलांच्या भविष्यासाठी आज पावले उचलणे जरुरीचे आहे. मराठी भाषा संवर्धन या विषयात खूप प्रयत्न सुरु झालेले आहेत, तसेच आणि त्याहून जोमाने मराठी शाळा संवर्धनाचे प्रयत्न आपण सगळे मिळून करूया. आणि मराठी शाळा पुन्हा एकदा बहरतील अशीच उज्वल आशा बाळगूया. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"श्रेया घोषाल" - बस नाम ही काफी है !!!!!

"कमलेश भडकमकर - एक मॉडर्न अवलिया"

कलाकारांचं आर्थिक नियोजन