“God–Mother” 






आज  मी  "वैशाली सामंत" या माझ्या आयुष्यातल्या एका अत्यंत महत्वाच्या  "Turning Point"  बद्दल बोलणार आहे. मला ठाऊक आहे की तुमच्यापैकी जवळ जवळ  सगळ्यांना माझी स्टोरी माहीत असेल. पण नसली तर इथे ती पुन्हा सांगणे क्रमप्राप्त आहे.

दुबईत मध्ये २००४ मध्ये मी नोकरी करीता पोहोचलो, २००९ पर्यंत उत्तम नोकरी सुरु होती. एक साधा मराठी मुलगा ते दुबईत स्थायिक मराठी मुलगा इतका प्रवास झालेला होता. तिथे विकेंड ला गाणं सुरु होतच, शास्त्रीय संगीत शिक्षणही सुरु होतं. माझ्या दुबईतल्या जडणघडणीत एक मोठा वाटा दुबई महाराष्ट्र मंडळाचा सुद्धा आहे. २००८ मध्ये मी मंडळाच्या कार्यकारिणीवर होतो आणि खूप छान कार्यक्रम त्यावर्षी आम्ही केले. त्यातलाच शेवटचा होता "वैशाली सामंत कॉन्सर्ट " आम्ही सगळेच खूप उत्सुक होतो. नेमका कामानिमित्त बाहेर असल्याने एका महत्वाच्या मीटिंग ला मी नव्हतो तेव्हा एक चर्चा झाली. काही कारणाने वैशाली सोबत येणारा गायक येऊ शकत नव्हता, तेव्हा माझा मित्र विवेक गलांडे याने थेट "आमच्याकडे एक गायक आहे तो नक्की गाईल  तुझ्यासोबत" असे वैशालीला कळवले. अर्थात आमची ओळख नसल्याने वैशालीला शंका आली की, कोण असेल हा गायक ?

मला फोन आला विवेकचा की तुझ्या वतीने मी कमिट केलंय, गाशील ना तू ? आता वैशाली सामंत सोबत कोण नाही गाणार ? खूप भारी वाटलं मला ही संधी मिळाल्याबद्दल. वैशाली सोबत फोन वर चर्चा झाली, तिने मला सांगितलं की गाणी पाठवते, बसवून घे. गाणी आली, आणि अर्थात मला ती गाणी थोडी नवीन होती कारण दुबईत तेव्हा मराठी गाणी कमी ऐकली जायची. ऑफिसात दिवस तीच गाणी ऐकत होतो, बॉसने विचारलं काय रे काम करतोयस ना ? म्हटलं हो पण एक मोठा कॉन्सर्ट आहे वीकएंड ला, त्याचीच तयारी.

वैशाली आली. तिला रिसिव्ह करायला एअरपोर्ट ला गेलो होतो. तेव्हापासूनच तिच्याशी बोलताना खूप सहज वाटलं, एवढी मोठी स्टार असूनही ती अत्यंत साधेपणानेच बोलत होती, मग तिच्यासोबत तालीम केली. जी तयारी केली होती ती पाहून वैशालीला हायसं वाटलं की शो चांगला होईल. शो चा दिवस आला आणि देवकृपेने माझं काम चांगलं झालं , वैशाली खुश होती. शो नंतर खूप आपुलकीने ती माझ्याशी बोलली. मला पण सही वाटलं. दिवसांनी वैशाली परत गेली मुंबईला.

आठवड्याभराने मला मंडळाच्या अध्यक्षांचा फोन आला, अरे वैशाली सामंत यांचा कॉल होता त्यांना तुझ्याशी बोलायचं आहे. मी फोन केला तेव्हा वैशाली म्हणाली की दिवसांनी कोल्हापुरात एक शो आहे. एका नामवंत चॅनेल साठी. तू येशील का गायला ? हा क्षण माझ्यासाठी Turning Point होता.
वैशाली सामंत सारख्या प्रथितयश गायिकेने मला बोलावलं ह्यातच खूप काही मिळालं होतं मला. ह्या कॉन्सर्ट साठी कोल्हापुरात गेलो तेव्हा वैशाली सोबत अजून काही काळ घालवता आला आणि तिने मला "तू मुंबईत ये" असं सांगितलं.


तिथूनच माझा प्रवास सुरु झाला, आज तो श्रेया घोषाल यांच्या पर्यंत येऊन ठेपलाय, आणि पुढे सुरु आहे. पण या सगळ्याचं श्रेय  वैशालीचंच. तिच्याकडे पाहून मी खूप शिकलो. तिच्यासोबत प्रवास केला आणि तिच्यातलं मोठं माणूसपण अनुभवलं. हॉस्पिटल मधून डिस्चार्ज घेऊन स्टेज वर येऊन उत्तम परफॉर्मन्स देण्याची तिची सचोटी पहिली. नवोदित कलाकारांना काम देण्यासाठीची तिची तळमळ जवळून पहिली. अनेकांना काहीही अपेक्षा ठेवता मदत करताना पाहिलं , एक माणूस म्हणून वैशाली खूपच मोठी आहे. याचा प्रत्यय सतत येतच राहतो. तिच्यासोबत इतकं काम करता आलं, आणि तिच्या सहवासात इतक्या गोष्टी शिकता आल्या, या गोष्टीचं खूप अप्रूप आहे मला. कलाकाराने चांगलं माणूस असणं किती महत्वाचं आहे हे तिच्याकडूनच शिकलोय.


प्रत्येकाला  “Godfather”  नसतो,  पण मला  “God-Mother”  आहे. ती माझी  Mentor,  Guide आणि गुरु आहे. याचा सार्थ अभिमान वाटतो. तिच्यासोबत अजून खूप काम करायचं आहे. आणि ते करायला मिळेलचहाही विश्वास आहे. देवाचे केवळ आभार मानू  शकतो मी यासाठी. थँक यु बाप्पा - स्वामी, तुमच्यामुळेच हे घडलं. अशी एकाहून एक सरस  माणसं मला भेटली - आणि समृद्ध झालो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"श्रेया घोषाल" - बस नाम ही काफी है !!!!!

"कमलेश भडकमकर - एक मॉडर्न अवलिया"

कलाकारांचं आर्थिक नियोजन