सारे सूरों का है ये ही मिलन.....

शाळेत असताना टीव्ही वर एक कार्यक्रम लागायचा, "TVS सारेगामा " !! एक सुंदर गाणारा व गोड दिसणारा तरुण गायक सूत्रसंचालन करायचा. त्याचं नाव "सोनू निगम" !! 
एपिसोडची सुरुवात एखाद्या गोड गाण्याने व्हायची, आणि पुढच्या तासाभरात छान स्पर्धा अनुभवायला मिळायची.


तेव्हापासूनच या कार्यक्रमात मला गाण्याची असीम इच्छा होती. त्याकाळी कॅसेट चा जमाना होता. ऑडिशन साठी गाणं गाऊन पाठवायचं होतं. कसंबसं करून गाणं रेकॉर्ड करण्यासाठी, बाबांच्या ओळखीने एक स्टुडिओ मिळाला. डिअर स्टुडिओ. तिथे गेलो आणि माझं पहिलं गाणं रेकॉर्ड केलं - "कुछ ना कहो ", लकीली मला लताबाईंनी गायलेला ट्रॅक मिळाला, खूप सही वाटलं.

कॅसेट तर झाली पण आता पाठवायची कशी ? तेव्हा Courier सर्विस इतकी सहज उपलब्ध नसायची आणि महाग पण खूप असायची. मग पोस्टाने पाठवायची कॅसेट, असं ठरवलं. पण कदाचित ती पोहोचलीच नाही, खूप वाट पाहिली, ना कॉल आला ना बोलावणं. साल १९९९.

साल २००३
सारेगामा मध्ये जायचं स्वप्न ताजं होतं. कॉलेजचे रंगीन दिवस सुरु झाले होते आणि एके दिवशी खबर लागली की ऑडिशन्स आहेत मुंबईत, मी लागलीच तयारीला सुरुवात केली. सोनूजींनंतर आता शान (गायक - शंतनू मुखर्जी ) हा शो करत होते. 


मात्र माझ्या मनावर, तोवर सोनूजींच्या गाण्यांचं आणि आवाजाचं भारूड स्वार झालं होतं. "जिंदगी मौत ना बन जाये" व "मेरा रंग दे बसंती चोला" ही फेव्हरेट गाणी होती, ज्यांच्या मदतीने पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवर माझी निवड झाली. खूप आनंद झाला मला व माझ्या घरच्यांनाही.

शूटिंगचा पहिलाच अनुभव. एपिसोड मध्ये गायचं दडपण खूप वेगळं असतं. कधीही न पाहिलेला सेट, लाईट्स, कॅमेराज, असंख्य लोक, जजेस असं खूप काही असतं. या सगळ्यातून माझ्या परीने संपूर्ण मेहेनतीने प्रयत्न केला; पण यश हाती लागलं नाही. खचुन न जाता अजून तयारी करत राहिलो. टीव्ही वर येण्याचं स्वप्न, तूर्तास साकार झालं होतंच आणि ही तर फक्त सुरुवात होती. शिकत राहिलो. अनुभव कमवत राहिलो.

२००४ ला दुबईत गेलो. तिथे नोकरी करून गाणं करत होतो. २००७ ला तिथल्या सारेगामाची ऑडिशन पास झालो आणि या वेळेस ठरवलं की, मागच्या अनुभवातून शिकून अजून जोमाने तयारी करायची.

देवकृपेने त्या स्पर्धेत चांगलं यश मिळालं; अंतिम फेरी गाठता आली. खूप शिकायला मिळालं. टफ बनलो. Confidence Level वाढली. Performance म्हणजेच सादरीकरण करण्यात अजून सुसूत्रता आली. गाणं बहरू लागलं.



हे सगळे टप्पे संगीत क्षेत्रातल्या शिकवण्या असतात. वय आणि अनुभव यांच्या संगमातून गाणं मुरत जातं, जसं लोणचं मुरतं ना बरणीत अगदी तसंच ... माझं गाणं या सगळ्या अनुभवांतून मुशाफिरी करून आलंय ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.

पुढे २००९ मध्ये मुंबईत आलो मी, २०१० मध्ये मराठी सारेगमप करण्याचा योग आला. पुन्हा एकदा अपडेट झालो, नवीन गोष्टी शिकलो. 


यश खूप नाही मिळू शकलं पण मिळाला तो अत्यंत मोलाचा "अनुभव" जो पैश्याने विकत घेता येत नाही. तोच घेऊन पुढे चालत राहिलो.

या सगळ्या स्पर्धांतून एक मोठी गोष्ट शिकता आली ती म्हणजे, तुम्हाला अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये तुमचं सर्वोत्तम सादरीकरण करायचं असतं, तुम्हाला मिळालेल्या अडीच मिनिटांमध्ये. हे प्रेशर जो पार करून जातो किंवा जाते ती आयुष्यात एक चांगला / चांगली कलाकार बनते यात वादच नाही.
फक्त त्यासाठी या सारख्या स्पर्धांकडे यशाची शिडी म्हणून न बघता "वीटभट्टी" म्हणून पाहिलं पाहिजे, चांगली मेहेनत केली तरच, चांगली वीट होऊन बाहेर येतो आपण. नाहीतर..... असो.

आज २०१७ मध्ये संगीत क्षेत्रात काम करत असताना, मला याच लाडक्या सारेगम कार्यक्रमाने परीक्षक म्हणून काम पाहण्याची संधी दिली, तेव्हा माझ्या या सर्व प्रवासाच्या आठवणी जाग्या झाल्या. 


आता जी लहान मुलं या शेड्युल मध्ये गाताहेत, ती दैवी आहेत. त्यांची देहबोली, त्यांचे सूर, त्यांचा आनंद सगळ्या गोष्टी एकत्र येऊन, झी टीव्ही सारेगामापा लिटल चॅम्प्स हा शो सगळ्या सांगीतिक स्पर्धांतून अव्वल आला आहे, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आणि या प्रवासात कुठेतरी आपलाही हातभार आहे याचा खूप आनंद होतो. सारेगामापा हा आता फक्त एक कार्यक्रम राहिला नसून ते माझच माझं कुटुंबच झालंय...... 












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"श्रेया घोषाल" - बस नाम ही काफी है !!!!!

"कमलेश भडकमकर - एक मॉडर्न अवलिया"

कलाकारांचं आर्थिक नियोजन