सूर नवा ध्यास नवा !!!!




आयुष्यातले काही क्षण कधीच संपू नयेत असं वाटत राहतं, ८ वर्षांनंतर टीव्ही वर मिळालेली गाण्याची संधीही  फक्त अशीच होती. आणि स्वतःशी केलेल्या या स्पर्धेचा विजेता आपणच ठरल्यानंतर होणारा आनंद व मिळणारं समाधान याला कशाचीच तोड नाही.





स्वतःशी स्पर्धा म्हणजे काय ?

गेली अनेक वर्षे टेलिव्हिजन वर काम करत असताना रिऍलिटी शो मधले माझे सहभाग, फारच निराशाजनक होते. स्पर्धेत गातोय म्हणून कॉन्शस होणे, त्यामुळे गाणं छान न उमटणे - डोक्यात बऱ्याच गोष्टी चालू असायच्या , म्हणजे आपला ड्रेस काय आहे पासून ते, आज परीक्षकांना कसं खुश करता येईल आपल्या गाण्यातून इथपर्यंत.

आणि आता इतक्या वर्षांनी हेच उमगलं की, आपण फक्त मिळालेलं गाणं १०० % गायचं असतं, आणि तितकंच आपल्या हातात असतं बस्स !!!!!




जेव्हा या विचाराला मी अंगिकारू शकलो, तेव्हाच माझं सादरीकरण हे मार्क्स - परीक्षकांची मते - या सगळ्याच्या परे गेलं . निदान मला तरी त्या सगळ्याचा काहीच फरक पडेनासा झाला.  आपला धर्म काय? चांगलं गायचं आणि मनं  जिंकायची एवढंच !!!!


आणि आयुष्यात एका गोष्टीची खूण  कायमची पटली - "गाणं मोठं असतं - आपण त्याच्यापुढे खूप छोटे असतो "
आपण फक्त गाण्याला आधीन व्हायचं, ते गाणं आपल्याला बरोबर प्रवाहातून नेतं, आणि खूप वेगळी अनुभूती देतं, जी शब्दातून मांडणं कठीण आहे.


"सूर नवा ध्यास नवा" मधून एक वेगळाच जयदीप - मला माझा म्हणून भेटला. अनेक नवीन - चांगल्या गोष्टी माझ्यात बदल म्हणून घडल्या.



शब्द पाठ होत नसत मला, पण या स्पर्धेत १५ आठवड्यात एकदाही शब्द न बघता गाणी सादर केली याचा आनंद वाटतोय. आणि म्हणूनच ती गाणी माझ्या सुजाण प्रेक्षकांना सुद्धा आवडली, भावली, भिडली.

जयदीप बगवाडकर म्हणजे फक्त जोरकस गाणी गाणारा - अशी माझी इमेज होती - पण या स्पर्धेत मला मिळालेली वेगवेगळ्या भावनांची गाणी - गायकांची गाणी सादर करताना मलाच माझं आश्चर्य वाटून गेलं.




आपण ठरवलं तर सगळं अचिव्ह करू शकतो याची खूप सुंदर जाणीव "सूर नवा" ने मला करून दिली.
निखळ प्रेम मिळालं, माझ्या सर्व परीक्षकांकडून. माझ्या सर्व स्पर्धक मित्र-मैत्रिणींकडून.




सर्वात मोलाची गोष्ट म्हणजे - माझ्या गाण्याला मिळालेली "नव - संजीवनी "
स्पर्धेच्या आधी काम नव्हतं काही काळ, नैराश्य होतं  मनात, वाटलं की आता कदाचित पडद्यामागे काम करत रहावं लागणार. पण सूर नवा ने एक झळाळी दिली, काम करण्याचा उत्साह दिला.






ऊर्जा मिळाली. आता थांबणार नाही, नवीन कल्पनांना  वाट करून देणार. त्यासाठी मेहेनत अपरिहार्य आहेच. पण आता मला माझ्या श्रोत्यांपर्यंत  माझा आवाज अजून पोहोचवायचाय, येणाऱ्या नवीन संगीत साधकांना माझ्या अनुभवातून मदत करायचीय, मला संगीतातून दिसलेलं अपार सौंदर्य माझ्या रसिक प्रेक्षकांना माझ्या गाण्यातून दाखवायचय.



धन्यवाद "सूर नवा ध्यास नवा", मला गाण्यासाठी नवीन ऊर्जा दिल्याबद्दल.
एक नवा जयदीप सज्ज आहे - नव्याने तुमची मने जिंकण्यासाठी.....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"श्रेया घोषाल" - बस नाम ही काफी है !!!!!

"कमलेश भडकमकर - एक मॉडर्न अवलिया"

कलाकारांचं आर्थिक नियोजन