सोनू निगम - एक अनभिषिक्त "दैवी" सूर




“सोनू निगम” या आवाजाची भूरळ पडलेल्या काही वेड्या लोकांमध्ये कदाचित माझा नंबर खूप वरचा असेल. कॉलेज मध्ये मला दर वेळेस गाणं गाण्याआधी सांगितलं जायचं - "बाबा रे ते जिंदगी मौत ना बन जाये - कृपया नको गाउस" कारण ते माझं जीवश्च कंठश्च आहे. त्यानंतर मी 'मेरा रंग दे बसंती चोला' गाऊ लागलो.

मला आठवतंय हिंदी सारेगम च्या राष्ट्रीय निवड समिती समोर सुद्धा मी तेच गायलं आणि सारेगम मध्ये प्रवेश मिळाला. हो…. सोनू सरांवरचं हे निस्सीम प्रेम सुरु झालं, अगदी माझ्या लहानपणी जेव्हा ते 'सारेगम' होस्ट करायचे. तरुणाई नुसती भारावून गेली होती. 'संदेसे आते है',  'ऐसा लगता  है' (रेफ्युजी ), 'ये दिल दिवाना' अशी एकाहून एक गाणी हिट झाली होती. सगळ्यात कहर म्हणजे "दिवाना" आल्बम. ओहो - अगदी आजही त्यातली गाणी, सगळीच ऐकली जातात.



सोनू निगम या आवाजाचा दबदबा उत्तरोत्तर वाढत गेला. अतिशय टॅलेंटेड अशा या गायकाने आदर्श घालून दिला की सुगम संगीतात आपली शैली निर्माण करणं म्हणजे काय असतं.. त्यांच्या स्ट्रगलच्या  काळातले खूप किस्से ऐकलेत. “मेहेनतीला पर्याय नाही”, याचं उत्तम उदाहरण आहेत ते.
दुबईत असताना मला २ वेळा त्यांचं लाईव्ह कॉन्सर्ट ऐकायला मिळालं. तो अनुभव कायमचा कोरला गेलाय मनात. ३ तास रंगमंचावर फक्त ऊर्जा होती आणि होता एक "अनभिषिक्त" "दैवी" सूर.



लाईव्हला गाताना, इतकं सुरेल, मी अगदी क्वचितच पाहिलंय - ऐकलंय. म्हणून मी नेहेमी म्हणतो की "सोनू निगम = LEGEND" लिजंड व्यक्ती फार कमी असतात. सोनुजी एक लिजंड आहेत. शब्दफेक, माईक वरचं अफलातून प्रोजेक्शन, आवाजातले Modulations ह्या सगळ्या तांत्रिक बाबींमधले बारकावे त्यांच्या कडूनच शिकावेत.

प्लेबॅकला कसं गावं, ह्याचाही आदर्श त्यांच्याकडून घेण्यासारखा आहे, एकदा त्यांचं लाईव्ह रेकॉर्डिंग पाहायला मिळावं अशी इच्छा आहे. होईल कधीतरी पूर्ण :)



काही वर्षांपूर्वी " रफी Resurrected " नावाचं एक कॉन्सर्ट झालं होतं, इंग्लंडच्या बर्मिंगहॅम सिंफनी ऑर्केस्ट्राने रफी साहेबांची निवडक गाणी वाजवली व सोनूजींनी आपल्या आवाजाने ती सजवली. मोहम्मद रफी साहेब म्हणजे सोनूजींचे गुरु, आणि त्यांनी त्यांचीच गाणी सुरुवातीला गाऊन स्वतःला सिद्ध केलं.



आता या कॉन्सर्ट मध्ये जेव्हा ते गायले, तेव्हा ते त्यांच्या ओरिजिनल आवाजात गायलेत. मला याचं खूप अप्रूप वाटतं की, आपल्यावर एखाद्या आवाजाचा कितीही पगडा असला तरी, स्वतःच्या आवाजात गाणं गाता येणं हे अजब आहे. आम्हा नवोदित गायकांसाठी हीच शाळा आहे, जिथे असे गुरु आहेत, ज्यांच्या आवाजातून इतकं शिकायला मिळतं अगदी सतत.

असे एकाहून अनेक सुखद सांगीतिक क्षण आहेत जिथे सोनूजींनी आपल्या आवाजाच्या जादूने बहार आणली आहे. ते क्षण असे लिहिता येण्याजोगे नाहीयेत. ऐकण्यासारखे आहेत. अनुभवण्यासारखे आहेत. इंटरनेट वर उपलब्ध आहेत. या बद्दल त्या सर्व संगीत दूतांचा मी आभारी आहे. ज्यांनी हे सगळं वैभव उपलब्ध करून दिलय. प्रत्येक जनरेशन मध्ये लिजंड्स जन्माला येतात, मला अभिमान आहे की माझ्या जनरेशन मध्ये मी सोनू निगम यांचा कार्यकाळ अनुभवू शकतोय. अगदी जवळून.


माझा एक मित्र, सुप्रसिद्ध बासरी वादक - वरद कठापूरकर सोनूजींसोबत दौरे करतो. तो भेटला की माझा पहिला प्रश्न असतो "देव कसा आहे रे ?" आणि त्याचं उत्तर नेहेमीच "देव मजेत आहे" असंच येतं. संगीत क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणारे अनेक दिग्गज होऊन गेले आहेत पण सोनूजींसारखा कलाकार आज जे काम करतोय ते खरंच अतुलनीय आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी सदिच्छा.... व त्यांच्याबरोबर किमान एकदा, मला स्टेजवर गायला मिळावं असं एक छोटंसं स्वप्न उराशी बाळगलंय, बघूया 'देवाच्या' मनात कधी येतंय :)


Author Note: The images used in this blog are sourced from the internet & 
                        There is no intention to infringe upon any copyright. 











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"श्रेया घोषाल" - बस नाम ही काफी है !!!!!

"कमलेश भडकमकर - एक मॉडर्न अवलिया"

कलाकारांचं आर्थिक नियोजन