सुरांना मिळालेली सोनेरी संधी

अवघ्या महाराष्ट्रातली ११ शहरं, ४२ शाळा, आणि २५००० हून जास्त मुलांसोबत मिळालेले सोनेरी क्षण. मला खुपच भाग्यवान असल्यासारखं वाटलं त्या क्षणी जेव्हा लोकमत वृत्तपत्र संस्थेने मला त्यांच्या बाल विकास मंच साठी बोलावलं. एक गायक म्हणून अशी संधी मिळणं हे खुपच अलौकिक होतं.

माझ्यासोबत माझी गायिका मैत्रीण डॉ. नेहा वर्मा होती, आणि तिच्यासोबत काम करताना या सर्व ठिकाणांना भेट देताना, मुलांसाठी ऑटोग्राफ देताना खरच खूप मज्जा वाटली. सगळ्या शाळांमधल्या मुलांना सांगण्यात आलेलं होतं की, मी आणि नेहा येणारोत, तेव्हा त्यांच्यातला उत्साह नुसता ओसंडून वाहत होता. शाळांच्या हॉल मध्ये आम्ही शिरताच चेहऱ्यावर हसू + आश्चर्य + उत्साह मिश्रित भाव, आणि टाळ्या वाजवून आमचं स्वागत केलं जात होतं. एक विलक्षण आनंद होता मनात त्या क्षणी.

त्याहून जास्त आनंद त्या सर्वांसाठी गाताना आणि त्यांना मंचावर बोलावून गाणी सादर करायला सांगताना होत होता. त्या सर्व मुला-मुलींच्या डोळ्यांमध्ये एक विशिष्ट चमक होती. आपण ज्यांना टी. व्ही. वर पाहतो असे जयदीप दादा आणि नेहा ताई आपल्याला भेटायला खास आलेत याचा खूप आनंद वाटत होता त्या सर्वांना.

शाळेतले शिक्षक सुद्धा तितक्याच प्रेमाने आणि आपुलकीने आम्हाला भेटत होते. त्यांच्या विद्यार्थ्यांना आम्ही प्रोत्साहन देत आहोत हे पाहून त्यांचे ही डोळे आनंदाने विस्फारत होते.

आजच्या या काहीश्या नकारात्मक सामाजिक वातावरणात शाळा ही आम्हाला एकच अशी सकारात्मक गोष्ट पाहायला मिळाली, जिथे संस्कार, चांगली शैक्षणिक मूल्य, आणि कलेला प्रोत्साहन देणारं आल्हाददायी वातावरण अजूनही शाबूत आहे. आणि महाराष्ट्रातल्या एकूण एक शाळा, मुलांना घडवण्याचं महत्वाचं काम खूप सुंदर रित्या करत आहेत याचा खूप अभिमान वाटला.

आपल्या येणाऱ्या नवीन पिढ्या चांगल्या घडत आहेत शाळांमध्ये, त्यांना खूप चांगले शिक्षक लाभत आहेत. फक्त अभ्यासच नव्हे तर कलेला ही प्राधान्य दिलं जात आहे, मुलांमधील सुप्त गुण जोखून त्यांच्या पालकांना त्या बाबतीत प्रोत्साहन देण्यासाठी शाळा काम करत आहेत हे सर्व पाहून खूप दिलासा मिळाला.

कलाकार म्हणून आपण समाजाचं काही देणं लागतो, या भावनेने प्रेरित असलेल्या या उपक्रमासाठी मला ही सोनेरी संधी दिल्याबद्दल लोकमत परिवाराचे आभार, मला ४ क्षण का होईना मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणता आलं हेच माझ्यासाठी खूप मोलाचं आहे.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"श्रेया घोषाल" - बस नाम ही काफी है !!!!!

"कमलेश भडकमकर - एक मॉडर्न अवलिया"

कलाकारांचं आर्थिक नियोजन