“परवरदिगार”
“श्वासात सूर ताजे, हृदयात ताल वाजे
यश कीर्ती ही क्षणाची, विद्या कधी न लाजे
उपकार मायबापा, वरदान हे प्रभूचे
हे रत्न संगीताचे, कंठी सदा विराजे
होवोन मुक्त, उधळेन मी, ही सुरासुरांची नाणी..परवरदिगार परवरदिगार !!!!!!”
स्वानंद किरकिरे यांचे हे शब्द, कौशल दादाचं आर्त संगीत आणि शंकर महादेवन यांचा
थेट भिडणारा सूर असा अप्रतिम मिलाफ असलेलं हे गाणं जेव्हा पहिल्यांदा गायलो तेव्हा
आत काहीतरी हललं.
“कौशलकट्टा” कार्यक्रमाच्या पहिल्या प्रयोगाचं औचित्य होतं, आणि प्रथमच मी हे गीत गाणार
होतो. या गीताच्या सुरुवातीला आनंद भाटे यांचा दैवी आवाज आपल्याला ऐकू येतो,
त्यांनी बालगंधर्वांचं एक पद “दया छाया घे निवारुनिया” म्हटलंय आणि मग कौशल दादा
ने गाणं परवरदिगार कडे नेलंय.
सिनेमा पाहिलेला असल्याने माझ्या डोळ्यांसमोर सीन उभा होता, बालगंधर्व - भोरच्या राजेसाहेबांकडून मिळालेली शाल, पुण्याच्या वाटेवर एका दर्ग्यावर वाहतात, आणि
फकिराला पैसे दान देतात, तिथून ही कव्वाली सुरु होते. गाण्याच्या ओरिजिनल ट्रॅक वर
मला गायचं असल्याने अगदी सिनेमासाठीच मी गातोय असं मनात वाटत होतं. भीती होती
मनात. गाणं तार सप्तकात जातं – मला जमेल का? म्हणजे नुसतं जमून चालत नसतं ते
श्रोत्यांना भिडलं पण पाहिजे. अश्या सर्व भावनांचा एकत्र कल्लोळ सुरु होता.
पण गाण्याला भेटलो, आणि कधी गुंगून गेलो त्या शब्दांत – त्यांच्या मागच्या
भावनांमध्ये – आणि त्या गहिऱ्या सुरावटीमध्ये ते कळलंच नाही. भानावर आलो तेव्हा
लोकं टाळ्या वाजवत होती, माझं सर्वांग शहारून थरथरत होतं. आणि मला पुढची १० मिनिटं
लागली त्या स्वर्गीय अनुभूतीतून बाहेर यायला.
माझा थेट संवाद साधला गेला होता त्या “परवरदिगार” शी. या गाण्यात मांडलेलं
साकडं पोचलं होतं त्याच्यापर्यंत. हे काहीतरी अद्भूत होतं माझ्यासाठी, आजवर न
घडलेलं, आतून हलवणारं काहीतरी. सांगितलं मी हे श्रोत्यांना – बोललो मी कौशल
दादाला, आणि हे होतं वारंवार प्रत्येक प्रयोगाला – एक मार्ग सापडलाय त्याच्याशी
संवाद साधण्याचा. आणि संधी हीच त्याचे आभार मानण्याची – की त्याने गळ्यात सूर
दिले. मन भारावून जातं प्रत्येक वेळी हे गाणं गायलो की.
अजून काय सांगू, माझ्या सुरांतून देवा माझी हाक तुझ्यापर्यंत अशीच पोहोचू दे,
आपलं हे कनेक्शन “कंजेशन फ्री” राहू देत आणि हे “नेटवर्क कवरेज” सदैव फुल्ल असुदेत......हीच
प्रार्थना !!!!

टिप्पण्या