आरास ही सज्ज झाली तुझ्या दर्शना.....
प्रिय बाप्पा,
तू येतोस. वाजत गाजत. आशीर्वाद देतोस. पाहुणचार घेतोस. आणि पुन्हा आपल्या गावी निघून जातोस. पण आम्ही मागे असलेले सगळे तुझ्या आगमनाची पुन्हा किती आतुरतेने वाट पाहत असतो ते तर तुला माहित आहेच.
प्रत्येक वेळेस, सुरुवात करताना तुझं नाव घेऊनच पुढे जातो. तू येणार म्हणून खूप तयारी करतो, तुझी वाट पाहतो. तुझ्यासाठी खरेदी करतो खूप साऱ्या वस्तू. तुझ्या आवडीचे पदार्थ बनवतो, मिठाई आणतो. तुझं येणं आम्ही खूप सेलिब्रेट करतो रे बाप्पा.
तुझ्या येण्याने मिळते एक उर्जा, जगण्याची नवी उमेद, नवीन काम सुरु करण्याचं बळ. एक आत्मविश्वास.
इतकी वर्ष तुझ्या आशीर्वादाने सगळं कसं छान चाललय, हे पाहायला तू नित्य नेमाने इथे असतोस. तुझा उत्सव संपला तरी इथेच रेंगाळतोस तू माहितिये मला.
गेलं वर्ष अख्खं डोळ्यांसमोरून जातंय - तू पुन्हा येतोयस आज, आनंद वाटतोय. या वेळेस माझ्या काही खास मागण्या आहेत तुझ्याकडे. घाबरू नकोस, संप नाही करणार मी. तुझी पूजा अर्चा तुला हवी तशीच करेन.
फक्त त्या मागण्या मान्य कर आणि त्यांची पूर्तता होऊ देत.
माझ्या देशबांधवांना सद्बुध्दी आणि सद्सद्विवेक बुध्दी दे, त्यांना मतदान करण्याची मती दे, स्त्रियांना शक्ती दे, आमच्यासाठी लढणारी सशक्त माणसे आमच्यापासून दूर नेऊ नकोस. मला माहिती आहे तुला चांगली माणसे आवडतात, पण आम्हाला त्यांची जास्त गरज आहे इथे. किमान त्यांच्यासारखं बनण्याची शक्ती दे बाप्पा.
अजून खूप मागायचय - मग आठवतं, तू मला आयुष्यभर पुरून उरतील असे सूर दिलेस गळ्यात.... त्या नंतर मागण्यासारखं काहीच उरत नाही... बस, त्या सुरांमधला सच्चेपणा तसाच राहू देत बाप्पा... त्या सुरांच्या फुंकरीने एखाद्या तरी मनाला दिलासा मिळाला तरी सार्थक होईल सगळ्याचं... चल, तुला ही खूप पत्र येत असतील, प्रार्थना होत असतील, सो मी तुला खूप डिस्टर्ब करत नाही. नेहमीसारखा हसत ये, तुझे आशीर्वाद आम्हाला दे, कृपादृष्टी राहूदेत.
तुझाच,
जयदीप

टिप्पण्या