अनुभूती.....सुरांची !!!!!
परवा माझ्या फोनवर मेसेज
आला - "उद्या सकाळी आहेस का ? ठाण्याला रेकॉर्डिंग आहे, "पितृऋण" सिनेमाच्या पार्श्वसंगीतासाठी (Background Score)" मी
लागलीच हो म्हटलं, सकाळी
१०.३० ची वेळ सांगितली होती. स्टुडीओ होता ऑडीओ-आर्टस, माझा मित्र आदित्य ओक याचा
अतिशय अद्ययावत असा स्टुडीओ.
"पितृऋण" या सिनेमाचं ट्रेलर मी नुकतच पाहिलं
होतं, नितीश
भारद्वाज यांनी दिग्दर्शित केलेला, सचिन खेडेकर, सुहास
जोशी आणि तनुजा जी असे मातब्बर कलाकार, कौशल दादाचं संगीत व पार्श्वसंगीत, सगळं मस्त जमून आलेलं,
मला ट्रेलर ही आवडलं, पण माहित नव्हतं की याच
सिनेमा साठी मला गायला बोलावलं जाईल.
स्टुडीओत
काम सुरु झालं, आणि
पहिल्यांदाच आयुष्यात, चित्रित झालेला सीन स्क्रीन वर पाहून, त्यावर कौशल दादा
सुचवत होता, त्याप्रमाणे आलाप गायचा होता. मला प्रसंग समजावून सांगण्यात आला आणि
सीन प्रमाणे मी गायलो.
पहिला, दुसरा आणि शेवटचा आलाप
सिनेमाच्या शेवटच्या फ्रेम वर संपला. एक कलाकार म्हणून इतकं भरून आलं मला की, या सिनेमाच्या ३ महत्वाच्या
प्रसंगांवर माझ्या आवाजाचा साज चढवण्यात आला होता, हा मला माझा सन्मानच वाटला.
आपण गायक म्हणून फिल्म इंडस्ट्री मध्ये गात असताना, तिथे आपल्याला
फिल्मशी निगडीत अश्या सर्व पैलूंवर जवळून काम करता येणं आणि त्याचा आनंद लुटता येणं
हे काही औरच. त्यातून सुद्धा, अभिनेत्यांच्या अप्रतिम
अभिनयाला सपोर्ट करण्यासाठी पार्श्वसंगीत कश्या पद्धतीने पेरलं जातं याचा अनुभव
घेणं माझ्यासाठी खूप अनोखं होतं. या आधी हॉलीवूड च्या सिनेमांचं पार्श्वसंगीत
बनताना YouTube वर
पाहिलेलं होतं. पण प्रत्यक्ष अनुभव म्हणजे खुपच ग्रेट वाटला.
या सुंदर अनुभूती साठी कौशल दादा आणि त्याच्या संपूर्ण टीमचे
मनापासून आभार.


टिप्पण्या